मी
मी,
कधी स्वतःचाच गुन्हेगार ,
तर कधी स्वतःचाच पाठीराखा,
देहातल्या प्रत्येक पेशीला न्याय देणारा
त्यांचाच जन्मदाता,
तर कधी मेलेल्या कातडीची
जळती चिता,
मी,
कुणाच्या नजरेत
हमीदार
बेवारस सत्याचा ,
तर कुणाच्या डोळ्यात,
साथीदार
सनातनी कायद्यांचा
पण काचेतून हस्तांतरित झालेला प्रकाशकिरण
देऊन जातो वेगळीच नजर,
त्यावरच जगतो मी
जसे जगतात ना सजीव प्राणवायूवर
अगदी तसाच
मी,
कवितेला उगम देणारा,
विविध भावनांनी प्रवाहित करणारा
त्याच वेळी तिला दाद देणारा
पण
शब्दांना धार देताना
त्यांच्या वेदना सहन करणाराही मीच
मी ,
माझ्या दृष्टीने,
हस्त नक्षत्रातल्या मयुराबरोबर नाचणारा,
तर कधी काकस्पर्शाबरोबर मयताच्या इच्छांना
अन बाकीच्यांच्या समजुती पूर्ण करणारा
मला नकोय अनुमती ,
ना दिलगिरी
फक्त हवीय साथ
विरोधही चालेल
पण पाहिजेय फक्त प्रामाणिकता
त्यासाठी माझा चष्मा दरवेळी पुसावा लागेल …
…
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा