सैराट..
झिंगाटगिरी करुन थकलेली, याड लागलेली ती दोघ लाल आकाशाखाली निपचित पडलेली ती दोघ हातात हात घेतलेली, मोरपंखाच्या छायेत लपलेली ती दोघ ह्या 'महान समाजाला' छोटस भोक पाडणारी ती दोघ त्यांची ही शांतता अजुन नागव करतेय त्या 'महान समाजाला' अन् आम्ही.. आम्ही एकच काम करतोय 'ठिगळ' लावण्याच आणि 'महान समाजाचा' विदृप देह लपवण्याच... 'ठिगळ' लावून लावून 'महान समाजाची' कापड 'नको नको' तिथ जिर्ण झालीत इतकी की 'महान समाजही' वेडीवाकडी हालचाल करतोय नागवपण लपवण्यासाठी हालचाल करून करून दुर्गंध येतोय घामाचा आता आम्ही होतोय अस्वस्थ पण ती दोघ शांत, निपचित आता पडु देत त्यांना शांत खुपदा बघितली 'महान समाजाची' आव आणलेली 'शांतता' आता त्या दोघांचीही 'शांतता' अनुभवावी म्हणतोय... त्यांच्या शांत स्पंदनातुन बाहेर आलेला 'सैराट' श्वास आत घुसला सरळ त्यान इतक पोखरलय की बेचैन वाटतय आता तरीही जिवंत आहे त्यांच्यातला 'सैराट' म्हणूनच पडु देत त्यांना शांत निपचित काहीस शांत सुस्थ असाव ह्या अस्वस्थ बेचैन जागेत...